Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीतील घटक पक्षांमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांच्या पक्षांतराची लगबग सुरूच आहे. अशा स्थितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) नाशिक जिल्ह्यात मोठा धक्का दिला आहे.
नाशिकच्या येवला तालुक्यात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडली आहे. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आणि छगन भुजबळांचे निकटवर्तीय समजले जाणारे विशाल परदेशी यांनी आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीची साथ सोडली आणि शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केला. हा प्रवेश नागपूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. येवल्याचे आमदार किशोर दराडे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हा पक्षांतर घडले.
विशाल परदेशी यांना शिवसेनेत येवला शहरप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे येवला भागात शिवसेनेची ताकद वाढली असून, राष्ट्रवादीची स्थिती कमकुवत झाली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिंदे यांनी परदेशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करत तात्काळ कामाला लागण्याचे आवाहन केले.
दरम्यान, महापालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांपूर्वी महायुतीत फोडाफोडी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, महायुतीतील कोणत्याही घटक पक्षाच्या नेत्याला किंवा पदाधिकाऱ्याला दुसऱ्या पक्षात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र, तरीही पक्षांतराच्या घटना घडत असल्याने महायुतीतील अंतर्गत तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
या घटनेमुळे नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम दिसून येईल, असे विश्लेषकांचे मत आहे. महायुतीतील हे पक्षांतर थांबणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


