मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या टोलुका आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ सोमवारी (१५ डिसेंबर) दुपारी प्रायव्हेट जेट कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. अकापुल्को येथून टोलुकाला येणाऱ्या सेस्ना सायटेशन III या जेटने इमर्जन्सी लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र तो औद्योगिक क्षेत्रातील सॅन माटेओ अटेंको येथे कारखान्याच्या छतावर आदळला. यात विमानाला प्रचंड आग लागली आणि ते पूर्णपणे जळून खाक झाले.
विमानात ८ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्स (एकूण १० जण) होते. मेक्सिको राज्य नागरी संरक्षण विभागाच्या माहितीनुसार, किमान ७ जणांचा मृत्यू झाला आहे. पायलटने कोसळण्यापूर्वी विमानतळ नियंत्रण कक्षाला इमर्जन्सी मेसेज पाठवला होता. विमान फुटबॉल मैदानावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना ते जवळील कारखान्याच्या छतावर आदळले.
आगीची तीव्रता इतकी होती की, अग्निशमन दलाला ती आटोक्यात आणण्यासाठी २ तासांहून अधिक वेळ लागला. जवळील गॅस टाक्या आणि इंधन साठ्यांमुळे धोका वाढल्याने सुमारे १३० नागरिकांना परिसरातून बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कारखाना रिकामा असल्याने जमिनीवर अतिरिक्त जीवितहानी टळली.
या अपघाताचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात विमान कोसळताना आणि नंतर लागलेली भीषण आग दिसते. अपघाताच्या कारणांचा तपास सुरू असून, प्राथमिक अंदाजानुसार यांत्रिक बिघाड असू शकतो. टोलुका आणि मेक्सिको नगरपालिकेच्या आपत्कालीन पथकांनी तात्काळ मदत कार्य केले. ही घटना मेक्सिको सिटीपासून सुमारे ५० किमी अंतरावर घडली असून, परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.


