सांगली : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला असून, भाजप, काँग्रेस आणि शरद पवार गटातील माजी महापौरांसह १५ हून अधिक माजी नगरसेवक अजित पवार गटात प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. सोमवारी (१५ डिसेंबर) रात्री पुण्यात या सर्वांनी अजित पवार यांची भेट घेतली असून, लवकरच मिरजेत अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.
या भेटीत पक्षप्रवेशावर सकारात्मक चर्चा झाली. अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि पद्माकर जगदाळे यांची उपस्थिती होती. प्रवेश करणाऱ्यांमध्ये मिरजचे माजी महापौर किशोर जामदार, काँग्रेसचे माजी नगरसेवक करण जामदार, भाजपचे शिवाजी दुर्वे, शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान, आरिफ चौधरी, चंद्रकांत हुलवान, नर्गिस सय्यद, आजम काझी, रमजान सतारमेकर, अंकुश कोळेकर, जनसुराज्य शकतीचे आनंदा देवमाने आणि संतोष कोळी यांच्यासह इतर दिग्गज माजी नगरसेवकांचा समावेश आहे.
या घडामोडीमुळे खासदार विशाल पाटील, आमदार जयंत पाटील यांच्यासह भाजपला मोठा धक्का बसला आहे. मिरज शहरात एकूण २७ जागा असून, या माजी नगरसेवकांच्या प्रवेशामुळे अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे. यामुळे भाजपसह काँग्रेस आणि शरद पवार गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महायुती एकत्र लढणार असल्याचे संकेत दिले आहेत, तर जयंत पाटील यांनी महाविकास आघाडी एकसंध राहील असे सांगितले. निवडणुकीच्या रणांगणात अजित पवार गटाची ही वाढती ताकद महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही आव्हान ठरू शकते. सांगली महापालिका निवडणुकीत आता पक्षांतर आणि युतीच्या चर्चांनी जोर धरला असून, पुढील काही दिवसांत आणखी घडामोडी घडण्याची शक्यता आहे.


