Manikrao Kokate News: सदनिका घोटाळा प्रकरणात कायदेशीर कचाट्यात सापडलेले माजी क्रीडामंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते माणिकराव कोकाटे यांना अखेर मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंचा राजीनामा स्वीकारून तो पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.
कायदे आणि नियम व्यक्तीपेक्षा मोठे – अजित पवार
माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर अजित पवारांनी ट्विट करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, न्यायालयाच्या निकालानंतर कोकाटे यांनी स्वतःहून पदत्याग केला आहे. आमचा पक्ष नेहमीच घटनात्मक नैतिकता आणि न्यायपालिकेचा सन्मान करत आला आहे. नियम हे कोणाही व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ आहेत, याच तत्त्वातून आम्ही हा राजीनामा स्वीकारला आहे.
हेही वाचा – Manikrao Kokate: मोठी बातमी! माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातूनचं अटक करणार? नाशिक पोलिसांच्या हालचालींना वेग
नाशिक पोलिस मुंबईत दाखल
दुसरीकडे, कोकाटे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर आणि कनिष्ठ न्यायालयाने अटक वॉरंट बजावल्यानंतर नाशिक पोलिसांचे एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. कोकाटे सध्या मुंबईत असल्याने त्यांना कोणत्याही क्षणी ताब्यात घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


