Eknath Shinde : महाराष्ट्रातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडणुकांत महायुतीच्या दणदणीत विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर (युबीटी) जोरदार निशाणा साधला. कल्याणमध्ये शिवसेना कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात बोलताना शिंदे यांनी शायरीच्या माध्यमातून विरोधकांना टोला लगावला: “नकली को आज किया ढेर, युबीटी को पता चला कौन है असली शेर, येतो अभी ट्रेलर है, पिक्चर बाकी है!”
या शायरीने सभागृहात एकच जल्लोष पाहायला मिळाला. शिंदे म्हणाले, “आम्हाला नकली शिवसेना म्हणणाऱ्यांची आज आठवण झाली. खरी शिवसेना कुणाची हे जनतेने दाखवून दिलं आहे.” ते पुढे म्हणाले की, येणाऱ्या काळात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडतील आणि आगामी महापालिका निवडणुकांतही महायुतीचा विजय निश्चित आहे.
महायुतीचा घवघवीत विजय
राज्यातील २८८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीने २०७ नगराध्यक्ष पदे जिंकली, तर महाविकास आघाडीला अवघी ४४ पदे मिळाली. भाजपाने सर्वाधिक जागा पटकावल्या, तर शिंदे सेनेने दुसऱ्या क्रमांकाची कामगिरी केली. हा विजय जनतेच्या विकासकामांवरच्या विश्वासाचे फळ असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवली परिसरात शिवसेना अधिक मजबूत झाली असून, कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता पुढच्या निवडणुकांत मोठा विजय मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. या मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदे यांच्या टीकेची आणि शायरीची राज्यभर चर्चा सुरू आहे. हा निकाल महापालिका निवडणुकांसाठी ‘ट्रेलर’ असल्याचेही महायुती नेत्यांनी म्हटले आहे.


