Saurabh Tayde : बुलढाणा जिल्ह्यातील ऐतिहासिक सिंदखेडराजा नगरपरिषदेच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या (राष्ट्रवादी काँग्रेस) २१ वर्षीय सौरभ तायडे यांनी दणदणीत विजय मिळवला. ते आता महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे नगराध्यक्ष ठरले आहेत. नुकतेच एम.एस्सी. (केमिस्ट्री) पूर्ण केलेला आणि सध्या बी.एड.चे शिक्षण घेत असलेला हा तरुण राजकारणात नवखा असूनही जनतेच्या प्रचंड साथीने नगराध्यक्षपदी विराजमान झाला.
या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये चुरस होती. शरद पवार गटाच्या बड्या नेत्यांची प्रचारसभा सिंदखेडराजात झाली नव्हती, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली होती. तरीही सौरभ तायडे यांनी बाजी मारली. सिंदखेडराजाच्या नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी त्यांना भरघोस मते देऊन विजयी केले.
सिंदखेडराजा हे राजमाता जिजाऊंचे जन्मगाव असलेले ऐतिहासिक शहर आहे. १५ वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी जिजाऊ जन्मोत्सवात येथे येऊन विकास आराखड्याची घोषणा केली होती, मात्र तो रखडला आहे. शहर विकासापासून वंचित राहिले असताना सौरभ तायडे यांनी नव्या विकासाच्या व्हिजनसह रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
विजयानंतर सौरभ तायडे म्हणाले, “मी नवीन विकासाचे व्हिजन घेऊन आलो आहे. शरद पवार साहेबांना भेटून त्यांच्या माध्यमातून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. राजकारणाचा अनुभव नसला तरी तरुणाईला सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण विकास करेन.”
राज्यातील दुसरे तरुण उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषदेत शिवसेना (शिंदे गट)च्या २२ वर्षीय सिद्धी वस्त्रे यांचा विजय. त्यांनी भाजपाच्या बालेकिल्ल्यात बाजी मारली आहे.
या निवडणुकीत महायुतीने एकूण बाजी मारली असली, तरी सिंदखेडराजासारख्या ठिकाणी तरुण उमेदवारांचे विजय राजकारणात नव्या पिढीच्या उदयाचे संकेत देत आहेत. सौरभ तायडे यांचा विजय तरुणांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.


