Raju Vaidya Resigns: विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महायुतीने आपला विजयी बाणा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही कायम राखला आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालांनी महाविकास आघाडीला मोठा दणका दिला असून, राज्यात भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. या यशात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या, तर अजित पवार यांची राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानावर राहिली आहे.
हेही वाचा – BMC Election 2026 : मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून मोहित कंबोज, ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
राजू वैद्य यांचा राजीनामा
निवडणुकीचे निकाल हाती येत असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून ठाकरे गटासाठी अत्यंत वाईट बातमी आली आहे. पक्षाचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एका बड्या नेत्याने साथ सोडल्यामुळे शहरात ठाकरे गटाला मोठे भगदाड पडले आहे. लोकसभा निवडणुकीतील यश विधानसभा आणि स्थानिक निवडणुकीत टिकवण्यात अपयश आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
महायुतीत ‘इनकमिंग’चा जोर
निकालांनंतर अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकारी आता सत्ताधारी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे धाव घेत आहेत. पक्षाला लागलेली ही गळती थांबवणे आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.
मुंबईसाठी नवी समीकरणं
एकीकडे पराभवाचे चटके सोसावे लागत असतानाच, मुंबई महापालिकेसाठी मात्र हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील युतीची चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच याची अधिकृत घोषणा होऊ शकते. या नव्या युतीत शरद पवार गट देखील सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईच्या सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन महायुतीला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.


