BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या रणधुमाळीत ठाकरे गटाच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी अखिलेश चित्रे यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे. भाजपने मुंबई महापालिका जिंकली तर महापौरपदी मोहित कंबोज (भाजप नेते) यांना बसवले जाईल, असा आरोप चित्रे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये केला.
त्यांनी लिहिले, “भाजपने मुंबईत आजपर्यंत शेट्टी, बारोट, ठाकूर, पटेल असे अमराठी उपमहापौर दिले… पत्रकार विचारतात ‘मुंबईचा महापौर मराठी असेल का?’ तर फडणवीस म्हणतात ‘महापौर महायुतीचाच होणार…’, शेलार म्हणतात ‘महापौर हिंदू होणार…’ पण कुणी छातीठोकपणे म्हणत नाही की महापौर मराठीच होणार! याचाच अर्थ त्यांचा अमराठी उमेदवार ठरलाय… मोहित कंबोज ठरलाय! मराठी माणसा, मुंबईवर उपऱ्याला राज्य करू द्यायचं का?”
या दाव्याने मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली असून, मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. ठाकरे गट आणि मनसेकडून महायुतीवर ‘मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणार’ असा आरोप होत असताना हा दावा त्याच रणनीतीचा भाग मानला जात आहे.
‘मुंबईला मराठी महापौरच मिळेल’, भाजपची भूमिका
दुसरीकडे, भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी स्पष्ट केले की, महायुती BMC जिंकली तर मुंबईला मराठी महापौर मिळेल. “मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करणारे आरोप निराधार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर स्पष्टीकरण दिले आहे,” असे शेलार म्हणाले. महायुतीने २२७ पैकी १५० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असून, जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. मोहित कंबोज हे भाजपचे ज्येष्ठ नेते असले तरी त्यांना महापौरपदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेले नाही. भाजपकडून महापौर उमेदवाराचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे.


