Koregaon Bhima Shaurya Divas २०२६ : १ जानेवारी २०२६ रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने विशेष नियोजन केले आहे. पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांच्या आदेशानुसार, ३१ डिसेंबर २०२५ सकाळी १० वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२६ मध्यरात्रीपर्यंत किंवा गर्दी पूर्णपणे ओसरल्यावेळेपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.
या कालावधीत चाकण, म्हाळुंगे, दिघी-आळंदी, देहूरोड आणि तळेगाव परिसरातील मुख्य मार्गांवर मोठे बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना (रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलीस वाहने) मात्र यातून सूट देण्यात आली आहे.
बंद असणारे मार्ग आणि निर्बंध
- चाकण ते शिक्रापूर मार्ग : दोन्ही दिशांना सर्व खाजगी वाहनांसाठी पूर्णतः बंद. फक्त अनुयायांच्या बसेसलाच येथे परवानगी.
- आळंदी परिसर : चाकण-आळंदी फाटा, भारतमाता चौक, मोशी चौक आणि पांजरपोळ चौकातून आळंदीकडे जाणाऱ्या जड, अवजड आणि मल्टी-ॲक्सल वाहनांना बंदी.
- एमआयडीसी क्षेत्र : चाकण, म्हाळुंगे, मरकळ आणि तळेगाव एमआयडीसीतील जड वाहनांना अनुयायांच्या मार्गावर येण्यास मनाई.
- मरकळ पुल : इंद्रायणी नदीवरील पुलावर ८ फूट उंचीचे लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. ८ फुटांपेक्षा जास्त उंचीच्या वाहनांना प्रवेश नाही.
लांब पल्ल्याच्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग
- मुंबई ते अहमदनगर (जड/मालवाहतूक वाहने) : वडगाव मावळ → एचपी चौक/म्हाळुंगे → वासोली फाटा किंवा वाघजाई नगर → बिरदवडी → रोहकल फाटा → पुणे-नाशिक रोड → खेड → मंचर → नारायणगाव → आळेफाटा.
- मुंबई ते अहमदनगर (हलकी खाजगी वाहने): वडगाव मावळ → तळेगाव-चाकण रोड → चाकण चौक → खेड → पाबळ → शिरूर.
- मुंबई-बेंगलोर हायवे: जुन्या हायवेवरून येणाऱ्या जड वाहनांना देहूरोड सेंट्रल चौकातून वाकड नाका → चांदणी चौक मार्गे वळवले जाईल. एक्सप्रेस-वेवरून येणाऱ्या वाहनांना उर्से टोलनाक्यावरून वाकड नाका → राधा चौक मार्गे पुणे शहरात प्रवेश.
अनुयायांच्या वाहनांसाठी विशेष व्यवस्था
- नाशिक मार्ग: बसेस चाकणमार्गे शिक्रापूर पार्किंगला. हलकी वाहने चाकण चौक → आळंदी → मरकळ → तुळापूर → लोणीकंद पार्किंग.
- मुंबई जुना हायवे: बसेस वडगाव फाटा → म्हाळुंगे → चाकण → शिक्रापूर. हलकी वाहने वडगाव फाटा → आळंदी फाटा → मोशी चौक → आळंदी-मरकळ → तुळापूर → लोणीकंद.
- एक्सप्रेस हायवे: हलकी वाहने उर्से टोल → वडगाव फाटा → चाकण चौक → आळंदी → लोणीकंद पार्किंग.
- पुणे शहरातून: विश्रांतवाडी किंवा आळंदी फाट्यावरून येणाऱ्या वाहनांना वाघोलीमार्गे लोणीकंद पार्किंगला वळवले जाईल.
पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या बदलांची दखल घेऊन पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाला सहकार्य करावे. एमआयडीसी आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनना वाहने बाहेर न काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या नियोजनामुळे अनुयायांना सोयीचे तर सामान्य प्रवाशांना कोंडी टाळता येईल.


