पुणे : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ च्या रिंगणात कुख्यात आंदेकर गँग आणि कोमकर कुटुंबातील वैमनस्य आता थेट राजकीय सामना घेऊन समोर येत आहे. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर (१९) याची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू आंदेकरसह अनेक जण आरोपी आहेत. आता या पार्श्वभूमीवर आयुषची आई आणि गुंड गणेश कोमकरच्या पत्नी कल्याणी कोमकर यांनी एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेकडून उमेदवारीसाठी मुलाखत दिली आहे.
प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ-नारायण पेठ) मधून कल्याणी कोमकर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. १९ डिसेंबर रोजी शिवसेना भवनात त्यांची मुलाखत झाली, ज्यात नीलम गोऱ्हे आणि रवींद्र धंगेकर यांनी भाग घेतला. दुसरीकडे, आंदेकर कुटुंबातील सदस्यांना विशेष मकोका न्यायालयाने निवडणूक लढवण्याची परवानगी दिली आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून आंदेकर कुटुंबातील दोन महिलांना उमेदवारी मिळण्याच्या चर्चा आहेत.
कल्याणी कोमकरांचा आक्रमक पवित्रा
कल्याणी कोमकर यांनी एका व्हायरल व्हिडीओत राजकीय पक्षांना कळकळीची विनंती केली आहे: “आम्हाला न्याय देता येत नसेल तर अन्याय तरी करू नका. आंदेकर कुटुंबीयांना तिकीट देऊ नका. माझ्या मुलाचं आयुष्य त्यांनी उद्ध्वस्त केलं आहे. जर तसं झालं तर मी पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करेन.” हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. तरीही कल्याणी स्वतः शिंदे शिवसेनेकडून तिकीट मागत आहेत, ज्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, पुणे महापालिकेसह इतर महापालिकांमध्ये १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होईल. भाजप-शिंदे शिवसेना युती आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये मुख्य लढत अपेक्षित आहे.या घडामोडींमुळे पुण्यातील गँगवॉर आता राजकीय मैदानात उतरली असून, पक्षांना उमेदवारी देताना न्याय आणि राजकीय समीकरणांचा विचार करावा लागणार आहे. राजकीय पक्ष कल्याणी कोमकरांच्या विनंतीची कितपत दखल घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.


