पुणे : मुंढवा येथील वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात दोन एफआयआर दाखल झाले असले तरी बावधन प्रकरणात फक्त मुद्रांक शुल्क बुडवण्याची तक्रार असल्याने पुढे काही निष्पन्न होणार नाही, असा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणातील गुन्ह्याची सविस्तर माहिती त्यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त विवेक मासाळ यांना दिली आहे.
पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दमानिया यांनी ठाम भूमिका मांडली की, टप्प्याटप्प्याने पोलीस कारवाई सुरू असली तरी पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी. या संपूर्ण प्रकरणात एकच एफआयआर आणि एकच तपास अधिकारी असणे आवश्यक आहे, अन्यथा तपासाची दिशा भरकटू शकते, असे त्या म्हणाल्या.
खारगे समितीसमोर दिग्विजय पाटील हजर राहत नसतील तर पार्थ पवार कधी हजर होणार, असा सवाल उपस्थित करत दमानिया यांनी पोलिसांनी दिग्विजय पाटील यांची गोडीगुलाबी चौकशी केल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांना ही केस लोक विसरतील अशी अपेक्षा असल्याचे सांगताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीए अमेडिया कंपनीच्या लोकांशी सातत्याने संपर्कात असल्याचा आणि मुंढवा येथे जमीन ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या गुंडांच्या कारवायांची माहिती अजित पवार यांना असल्याचा दावा केला.


