पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांसाठी नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा आणि महानैवेद्य सहभाग योजना उपलब्ध करून दिल्या जातात. आता १ जानेवारी ते ३१ मार्च २०२६ या कालावधीतील पूजांची ऑनलाइन नोंदणी २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
हा निर्णय समितीच्या १५ जूनच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासाठी विशेष संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविक https://www.vitthalrukminimandir.org या अधिकृत संकेतस्थळावरून घरबसल्या नोंदणी करू शकतील.
यापूर्वीच्या टप्प्यात (७ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर २०२४, जानेवारी ते मार्च २०२५, एप्रिल ते जुलै २०२५ आणि ऑगस्ट ते डिसेंबर २०२५) महाराष्ट्रासह कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील भाविकांनी मोठ्या संख्येने नोंदणी केली होती. यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
पाचव्या टप्प्यात सण-उत्सव आणि गर्दीचे दिवस वगळून इतर दिवसांच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, महानैवेद्य सहभाग योजना तसेच जानेवारी २०२६ मधील तुळशी अर्चन पूजा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाइन नोंदणीत अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयात मदत मिळेल.
अटी-शर्ती आणि अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. संपर्कासाठी: ०२१८६-२९९२९९. कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आवाहन केले की, बुकिंग फक्त अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे, त्रयस्थ व्यक्तींशी संपर्क साधू नये.
देणगी मूल्ये:
– श्री विठ्ठल नित्यपूजा: २५,००० रुपये
– श्री रुक्मिणी नित्यपूजा: ११,००० रुपये
– पाद्यपूजा: ५,००० रुपये
– तुळशी अर्चन पूजा: २,१०० रुपये
– महानैवेद्य सहभाग: ७,००० रुपये
भाविकांनी लवकरात लवकर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


