Khopoli Murder Case : रायगड जिल्ह्यातील खोपोलीत २६ डिसेंबर रोजी मोठी खळबळ उडवणारी घटना घडली. एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे (वय ४५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. मंगेश हे मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परत येत असताना काळ्या कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना अडवले आणि हल्ला चढवला. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मंगेश यांच्या चुलत भावाच्या फिर्यादीवरून खोपोली पोलिसांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, जिल्हा प्रवक्ते भरत भगत, रवींद्र देवकर, त्यांचे मुले दर्शन देवकर आणि धनेश देवकर, सचिन चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाउंसर आणि इतर ३ अनोळखी व्यक्तींसह एकूण १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपांमध्ये हत्येचा कट रचणे, खून आणि शस्त्र कायद्याच्या कलमांचा समावेश आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा आरोप
नुकत्याच झालेल्या खोपोली नगरपरिषद निवडणुकीत (२१ डिसेंबर) मानसी काळोखे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. त्यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उर्मिला देवकर लढत होत्या, ज्या ७०० हून अधिक मतांनी पराभूत झाल्या. या राजकीय पराभवातून आणि पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा आरोप शिंदे गटाकडून होत आहे.
शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदार भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसवर राजकीय सूडबुद्धीतून हत्या झाल्याचा आरोप केला. मंगेश हे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक होते, तर घारे यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत थोरवे यांच्या विरोधात अपक्ष लढत दिली होती. दुसरीकडे, सुधाकर घारे यांनी आरोप फेटाळले आणि म्हणाले, “माझा या घटनेत कोणताही हात नाही. हे दुःखद आहे, मी काळोखे कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहे. आमदार थोरवे यांनी पोलिसांवर दबाव टाकून माझे नाव गोवले आहे.


