Andekar Gang : पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी घडामोड घडली आहे. नाना पेठेतील कुख्यात आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर (वय ७०), त्यांची भावजय आणि माजी नगरसेविका लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०) तसेच सून आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली वनराज आंदेकर (वय ३६) यांना विशेष मकोका न्यायालयाने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सशर्त परवानगी दिली आहे. हे तिघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले की, अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचार यात्रा, भाषण, घोषणाबाजी किंवा सार्वजनिक ठिकाणी जल्लोष करता येणार नाही. अर्ज दाखल करण्यासाठी कडक पोलीस बंदोबस्त पुरवला जाईल. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी “निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे” असे नमूद करत ही परवानगी दिली.
या तिघांनी अॅड. मिथुन चव्हाण यांच्यमार्फत अर्ज केला होता. त्यामुळे त्यांचा अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबरपर्यंत आहे.
नेमकं प्रकरण काय?
हे तिघे आयुष कोमकर (वय १९) हत्याकांडात आरोपी आहेत. ५ सप्टेंबर २०२५ रोजी नाना पेठेत आयुषची गोळ्या घालून हत्या झाली होती. ही हत्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर (बंडू यांचा मुलगा) यांच्या १ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या हत्येचा बदला मानली जाते. वनराज यांची हत्या त्यांच्या बहिणींशी संपत्ती वादातून झाली होती, ज्यात कोमकर कुटुंबीय आरोपी आहेत. आयुष हा बंडू यांच्या मुलीचा मुलगा होता.
आंदेकर टोळी आणि कोमकर-गायकवाड टोळीतील जुने वैर, संपत्ती वाद आणि राजकीय वर्चस्व यातून हे प्रकरण उफाळून आले. या खटल्यात मकोका कायदाही लागू आहे.


