मुंबई : भांडुप रेल्वे स्थानकाबाहेर सोमवारी (२९ डिसेंबर) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा मोठा अपघात झाला. रिव्हर्स घेताना चालकाचे बसवर नियंत्रण सुटले आणि फूटपाथवर रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांना बसने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तीन महिला आणि एक पुरुष अशा चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर राजावाडी आणि एम. टी. अग्रवाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना भांडुप स्थानकाबाहेर स्टेशन रोडवर घडली आहे. रूट नंबर ६०६ वरील ओलेक्ट्रा कंपनीची वेट लीजवरील एसी बस रिव्हर्स घेत असताना चालक संतोष रमेश सावंत (वय ५२) याने ब्रेकऐवजी अॅक्सिलेटर दाबल्याने बसचा वेग वाढला. बस प्रथम रस्त्यावरील खांबाला धडकली आणि नंतर फूटपाथवर चढून प्रवाशांना चिरडली. काही प्रवासी हवेत उडाले तर काही बसखाली सापडले. अपघात इतका भीषण होता की परिसरात एकच गोंधळ उडाला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये बस अचानक वेगाने गर्दीत शिरताना आणि लोक पळताना दिसत आहे. हा अपघात गेल्या वर्षी कुर्ल्यातील बेस्ट बस अपघाताची आठवण करून देणारा आहे. बेस्टने चालकाला निलंबित केले असून, त्याच्यावर निष्काळजीपणाने मृत्यू कारणीभूत ठरण्याचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. कंडक्टर भगवान घारे यांनाही चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताची दखल घेऊन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काँग्रेस नेत्यांनी अपघाताची चौकशी आणि बेस्टच्या वेट लीज मॉडेलवर टीका केली आहे. परिसरातील हॉकर आणि गर्दीमुळे यूटर्न घेणे कठीण असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
घटनास्थळी डीसीपी हेमराजसिंह राजपूत, अग्निशमन दल, फॉरेन्सिक टीम आणि १०८ रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाल्या. तपास सुरू असून, बस ड्रायव्हरच्या प्रशिक्षणाचीही चौकशी होणार आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.


