Chhatrapati Sambhajinagar: महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमधील भाजपमध्ये अभूतपूर्व गोंधळ उडाला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याच्या आरोपावरून संतप्त इच्छुकांनी केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.
नेत्यांच्या गाडीला घेराव आणि काळं फासलं
उमेदवारी न मिळाल्याने संतापलेल्या कार्यकर्त्यांनी भागवत कराड आणि अतुल सावे यांच्या गाड्या अडवून त्यांना घेराव घातला. यावेळी कार्यकर्त्यांनी दोन्ही नेत्यांच्या फोटोंची फाडाफाड केली आणि त्यांच्या गाड्यांना काळं फासून आपला निषेध नोंदवला. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की, काही कार्यकर्त्यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
हेही वाचा – Pune BJP Candidate List : पुण्यातील भाजपची उमेदवारी यादी जाहीर; निष्ठावंतांना डावलल्याने नाराजीचा सूर
‘पीए’ आणि नातेवाईकांनाच उमेदवारी? कार्यकर्त्यांचे गंभीर आरोप
आम्ही ४०-४० वर्षे पक्षासाठी रक्त आटवले, पण ऐन निवडणुकीत आम्हाला डावलून आयात उमेदवारांना आणि मंत्र्यांच्या पीएला तिकीट देण्यात आले, असा गंभीर आरोप नाराज कार्यकर्त्यांनी केला आहे. अतुल सावेंनी फक्त स्वतःच्या जवळच्या लोकांना आणि वंजारी समाजालाच झुकते माप दिले आहे. त्यांनी उमेदवारीचा अधिकृत सर्वे जाहीर करावा, त्यात माझे नाव नसेल तर मी गुलामी पत्करेन, अशा शब्दांत एका कार्यकर्त्याने आपले दुःख व्यक्त केले.
महिला कार्यकर्त्यांचा आक्रोश; सावेंचा मागच्या दाराने पळ
भाजपच्या प्रचार कार्यालयात काल दिवसभर राडा सुरू होता. काही महिला कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा देत आक्रोश केला, तर काहींना या गोंधळात भोवळ देखील आली. कार्यकर्त्यांचा वाढता संताप आणि आक्रमक पवित्रा पाहून मंत्री अतुल सावे यांनी कार्यालयाच्या मागच्या दाराने काढता पाय घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


