Pune BJP Candidate List : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कमालीचे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. भाजपने आपली अधिकृत यादी जाहीर करण्याऐवजी थेट इच्छुकांना ‘एबी’ फॉर्मचे वाटप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, या प्रक्रियेदरम्यान पुण्यात सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा आणि गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
घराणेशाहीचा आरोप आणि नाराजी
यावेळच्या उमेदवारी वाटपात भाजपने दिवंगत नेत्यांच्या वारसांना प्राधान्य दिले आहे. मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक आणि गिरीश बापट यांची स्नुषा स्वरदा बापट यांना पक्षाने मैदानात उतरवले आहे. यामुळे पक्षावर घराणेशाहीचा आरोप होत असून, अनेक वर्षांपासून पक्षासाठी झटणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रविवारी सायंकाळपर्यंत यादीची प्रतीक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पदरी अखेर निराशाच पडली.
हेही वाचा – पुणे महापालिकेत भाजपला बंडखोरीचा मोठा फटका; ४२ विद्यमान नगरसेवकांचे तिकीट कापले, वाचा संपूर्ण यादी
भाजपची प्रभागनिहाय उमेदवार यादी (प्रमुख प्रभाग):
पुणे महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात भाजपने आपल्या उमेदवारांची फळी उतरवली आहे. यामध्ये कळस-धानोरी (प्रभाग १) मधून राहुल भंडारे, संगीता दांगट, वंदना खांदवे आणि अनिल टिंगरे निवडणूक लढवणार आहेत. कल्याणीनगर-वडगाव शेरी (प्रभाग ५) मध्ये नारायण गलांडे, श्वेता गलांडे, कविता गलांडे आणि योगेश मुळीक यांना संधी देण्यात आली आहे. शिवाजीनगर-मॉडेल कॉलनी (प्रभाग १२) मधून अमृता म्हेत्रे, अपूर्वा खाडे, पूजा जगडे आणि डॉ. निवेदिता एकबोटे आपले नशीब अजमावतील.
मध्य पुण्यातील कसबा गणपती (प्रभाग २४) मध्ये कल्पना बहिरट, उज्ज्वला यादव, देवेंद्र वडके आणि गणेश बिडकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या शनिवार पेठ-मंडई (प्रभाग २५) मध्ये स्वप्नाली पंडित, बापू मानकर यांच्यासह स्वरदा बापट आणि कुणाल टिळक ही महत्त्वाची नावे आहेत. डेक्कन-हॅपी कॉलनी (प्रभाग २९) मध्ये सुनील पांडे, मंजुश्री खर्डेकर, मिताली सावळेकर आणि पुनीत जोशी यांना उमेदवारी मिळाली आहे, तर मयूर कॉलनी-कोथरूड (प्रभाग ३१) मधून दिनेश माथवड, ज्योत्स्ना कुलकर्णी, वासंती जाधव आणि पृथ्वीराज सुतार भाजपचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
प्रचारासाठी दिग्गजांची फौज मैदानात
निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने कंबर कसली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात तीन मोठ्या जाहीर सभा घेणार आहेत. तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील पुणे दौऱ्यावर येणार आहेत. शाह कोणतीही जाहीर सभा न घेता केवळ प्रमुख पदाधिकाऱ्यांची कोअर कमिटी बैठक घेऊन निवडणुकीच्या रणनीतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्याने आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा धुरळा उडणार आहे.


