Solapur Crime: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सोलापूर जिल्ह्यात एक थरारक घटना घडली आहे. अक्कलकोट येथील बासलेगाव रोड परिसरातील एका घरात २० वर्षीय तरुणीचा गळा चिरून खून करण्यात आला. या घटनेनंतर हल्लेखोर तरुणाने स्वतःवरही वार करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
सोलापूरच्या रामवाडी परिसरातील स्नेहा श्रीकांत बनसोडे (वय २०) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी आदित्य रमेश चव्हाण (रा. नागूरतांडा) या संशयित तरुणाने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. रविवारी सकाळी १०.३० ते ११.४५ च्या दरम्यान पिरजादे प्लॉटमधील एका बंद खोलीत हा सर्व प्रकार घडला. स्नेहाचा जागीच मृत्यू झाला असून, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आदित्यवर सध्या सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्नेहाचे शिक्षण अक्कलकोटमधील मैंदर्गी येथे तिच्या मामांकडे झाले होते. याच काळात तिची आदित्यशी ओळख झाली होती. आदित्य तिला लग्नासाठी विचारणा करत असे, मात्र स्नेहाच्या कुटुंबीयांनी या नात्याला स्पष्ट विरोध केला होता. आमच्या मुलीच्या वाटेला जाऊ नको, असे त्याला बजावण्यात आले होते. असे असूनही दोघे संपर्कात होते. रविवारी ‘स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाते’ असे सांगून स्नेहा अक्कलकोटला आली होती, जिथे त्यांच्यात झालेल्या वादाचे रूपांतर अखेर हत्येत झाले.
तपासाची सद्यस्थिती
घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट उत्तर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुराव्यांच्या संकलनासाठी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आदित्य चव्हाण विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्नेहाचे वडील १५ वर्षांपूर्वीच वारले आहेत. तिची आई शाळेत शिपाई म्हणून काम करून घर चालवत होती. ऐन उमेदीच्या काळात मुलीचा असा अंत झाल्याने कुटुंबावर मोठी शोकाकळा पसरली आहे. दरम्यान, हल्लेखोर आदित्यची प्रकृती अद्याप गंभीर असून, तो शुद्धीवर आल्यानंतर या हत्येमागचे नेमके कारण आणि त्या दिवशी नेमके काय घडले, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.


