पुणे | गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणात पुण्यातील प्रतिष्ठित दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अडचणीत आले आहे. सहधर्मादाय आयुक्तांनी रुग्णालयाच्या 11 विश्वस्तांविरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करत शिवाजीनगर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात खटला दाखल केला आहे. या प्रकरणात उषा मंगेशकर यांच्यासह मंगेशकर कुटुंबातील अन्य विश्वस्तांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी एप्रिल 2025 मध्ये गर्भवती तनिषा भिसे यांना तातडीच्या प्रसूतीसाठी दीनानाथ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णालयाने अनामत रकमेची मागणी केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला होता. त्यानंतर उपचारात विलंब झाल्याने तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला, असा दावा करण्यात आला. या घटनेची गंभीर दखल घेत सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाने स्वतःहून चौकशी सुरू केली होती.
चौकशीत गंभीर नियमभंग उघड
धर्मादाय उपायुक्त डॉ. राजेश परदेशी, रुग्णालय विभागाचे अधीक्षक दीपक खराडे यांच्या समितीने रुग्णालयातील नोंदी, उपचारांची वेळ, वैद्यकीय निर्णय प्रक्रिया आणि व्यवस्थापनाची भूमिका तपासली. चौकशीत तातडीच्या रुग्णांना उपचार देणे, अनामत रक्कम न घेणे आणि गरीब व अल्प उत्पन्न गटातील रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात उपचार देणे या नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले.
उपलब्ध कागदपत्रांवरून तनिषा भिसे यांना प्रत्यक्ष उपचार देण्यात आल्याचे ठोस पुरावे आढळून न आल्याचा निष्कर्षही अहवालात नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 41(अअ) आणि 66(ब) अंतर्गत फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश दिले.
एक वर्ष कारावास व दंडाची तरतूद
कलम 41(अअ) अंतर्गत दोषी आढळल्यास 25 हजार रुपयांपर्यंत दंड आणि एक वर्षाचा कारावास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर कलम 66(ब) अंतर्गत एक वर्ष कारावास आणि 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.
या 11 विश्वस्तांविरोधात खटला
पंडित हृदयनाथ मंगेशकर, भारती मंगेशकर, उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, डॉ. धनंजय केळकर, डॉ. उत्क्रांत कुर्लेकर, डॉ. जितेंद्र क्षीरसागर, विधिज्ञ पी. एम. खिरे, सचिन व्यवहारे, आर. पी. जोशी आणि डॉ. प्रसाद राजहंस यांच्याविरोधात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.
रुग्णालय प्रशासनाचा खुलासा
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने मात्र आरोप फेटाळले आहेत. धर्मादाय आयुक्तालयाचा कोणताही अधिकृत अहवाल अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही, असा दावा रुग्णालयाने केला आहे. रुग्णाला उपचार न देता परत पाठवले नसून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता रुग्णालय सोडण्यात आल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


