Hidayat Patel Passed Away : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष तथा अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्यावर अकोट तालुक्यातील मोहाळा येथे धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या हिदायत पटेल यांचा अकोल्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत पटेल (वय ६७) हे मंगळवारी मोहाळा येथील मशिदीत नमाज अदा करण्यासाठी गेले होते. नमाजानंतर दुपारी सुमारे दीडच्या सुमारास उबेद उर्फ उमेद पटेल कालू पटेल (वय २५) या युवकाने त्यांच्यावर अचानक चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात मान आणि पोटावर गंभीर जखमा झाल्याने हिदायत पटेल रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर कोसळले.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी तत्काळ त्यांना अकोट येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारांसाठी त्यांना अकोला येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
सहा वर्षांपूर्वीच्या हत्येचा बदला?
दरम्यान, २४ मे २०१९ रोजी भाजप अल्पसंख्याक आघाडीचे कार्यकर्ते मतीन पटेल यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात हिदायत पटेल यांच्यासह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. आजचा हल्लेखोर उबेद पटेल हा मतीन पटेल यांचा पुतण्या असून, काकाच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. तसेच सहा महिन्यांपूर्वी उबेद पटेल याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही समोर आली आहे.
आरोपी अटकेत
हल्ल्यानंतर आरोपी फरार झाला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने काही तासांतच त्याला पणज येथून अटक केली आहे. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.
हिदायत पटेल हे काँग्रेसचे अत्यंत ज्येष्ठ आणि प्रभावी नेते होते. त्यांनी अकोला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून उमेदवारीही घेतली होती. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली आहे.


