पिंपरी-चिंचवड : ‘पुण्यातील गुन्हेगारी संपवणार’ अशी घोषणा करणाऱ्या राजकीय पक्षांवरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी विविध पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तसेच गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याचे समोर आले आहे. उमेदवारी अर्जात सादर केलेल्या माहितीवरून ही बाब उघड झाली असून, त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे.
येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी दाखल झालेल्या अर्जांनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत तब्बल 34 उमेदवारांवर गुन्हे दाखल असून त्यात दोन महिलांचाही समावेश आहे. तसेच कागदोपत्री स्वच्छ प्रतिमा असली तरी पोलिसांच्या नोंदीत ‘राजकीय गुंड’ म्हणून उल्लेख असलेले 17 उमेदवार देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?
- भाजप : 17 उमेदवार
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : 13 उमेदवार
- शिवसेना : 4 उमेदवार,
यामध्ये दोन महिला उमेदवारांचा समावेश आहे. तर पोलिसांच्या दप्तरी ‘राजकीय गुंड’ म्हणून नोंद असलेल्यांमध्ये भाजपचे 8, राष्ट्रवादीचे 7 आणि शिवसेनेचे 2 उमेदवार आहेत. विशेष म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 8 पती राजांच्या पत्नी देखील उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
सिद्धार्थ बनसोडे प्रकरण चर्चेत
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना सर्वाधिक तिकीट दिल्याचा आरोप अजित पवार गटावर होत आहे. विशेषतः पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांना प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यावर ‘हाफ मर्डर’सह दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना सिद्धार्थ बनसोडे म्हणाले, “हे प्रकरण तीन वर्षांपूर्वीचे असून सध्या न्यायप्रविष्ट आहे. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत मला दोषी ठरवता येणार नाही. मी सर्वसामान्य तरुण म्हणून निवडणूक लढवत असून प्रभागातून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच विरोधक आरोप करत आहेत.”
आंदेकर कुटुंबावरून वाद
पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीशी संबंधित व्यक्तींना उमेदवारी दिल्यानेही वादंग झाले आहे. वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर आणि बंडू आंदेकर यांची वहिनी लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आले आहे. या दोघीही एका हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहेत. याशिवाय राष्ट्रवादीने जयश्री मारणे (गजानन मारणे यांची पत्नी), बापू ऊर्फ कुमार नायर, पिंटू धवडे आणि रोहिदास चोरगे यांनाही उमेदवारी दिल्याचे वृत्त आहे.


