BJP Congress Alliance: अंबरनाथ नगरपरिषदेत सत्तेसाठी भारतीय जनता पक्षाशी युती करणे काँग्रेसच्या नगरसेवकांना महागात पडले आहे. पक्षविरोधी कारवाया आणि भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने अंबरनाथमधील सर्व 12 नगरसेवकांना तडकाफडकी निलंबित केले आहे. यासोबतच स्थानिक ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणीही बरखास्त करण्यात आली असून, काँग्रेसच्या या कठोर भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
सत्तेसाठी भाजप-काँग्रेसची ‘अंबरनाथ विकास आघाडी’
अंबरनाथ नगरपरिषदेच्या 60 जागांच्या निकालात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने चक्क काँग्रेससोबत हातमिळवणी केली. या युतीला ‘अंबरनाथ विकास आघाडी’ असे नाव देण्यात आले आहे. अंबरनाथ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो, तिथेच भाजपने काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेला धक्का दिल्याने युतीमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.
हेही वाचा – मनसेला 24 तासांत दुसरे मोठे भगदाड! ‘या’ बड्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी
पक्षश्रेष्ठींची कठोर भूमिका
प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निलंबनावर स्पष्टीकरण दिले. कोणत्याही स्तरावर भाजपशी युती करणे काँग्रेसच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. ही शिस्तभंग करणारी कृती खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. मुंबईपासून 70 किमी अंतरावर असलेल्या या शहरात झालेल्या अनपेक्षित राजकीय प्रयोगावर काँग्रेसने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे.
शिंदे गटाची ‘अभद्र युती’वरून टीका
अंबरनाथमध्ये शिवसेनेला डावलून भाजपने काँग्रेसशी सोयरिक केल्यामुळे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देणारा पक्ष आता शिवसेनेला संपवण्यासाठी काँग्रेसला जवळ घेत आहे, ही एक ‘अभद्र युती’ आहे, अशी टीका त्यांनी केली. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही नाराजी व्यक्त करत, हा प्रश्न आमचा मित्रपक्ष असलेल्या भाजपचा आहे, त्यांनीच यावर उत्तर द्यावे, असे म्हटले.
भाजपचे स्पष्टीकरण आणि फडणवीसांचा इशारा
भाजपचे उपाध्यक्ष गुलाबराव करंजुळे पाटील यांनी शिंदे गटावरच पलटवार केला आहे. गेल्या 25 वर्षांपासून भ्रष्टाचारात गुंतलेल्यांसोबत राहण्यापेक्षा आम्ही हा पर्याय निवडला. आम्ही चर्चेसाठी प्रयत्न केले, पण प्रतिसाद मिळाला नाही, असा दावा त्यांनी केला. मात्र, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर कडक भूमिका घेतली आहे. काँग्रेससोबतची युती मान्य नाही. स्थानिक पातळीवर घेतलेला हा निर्णय तातडीने दुरुस्त केला जाईल, असे आदेश त्यांनी दिले आहेत.


