Manohar Mama Bhosale : व्यवसायात भरभराटीचे गाजर दाखवून एका तरुणाला लाखो रुपयांचा गंडा घालणारा भोंदू मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारे आता पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. माढा न्यायालयाने या दोघांनाही ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यातील मांजरी परिसरातून मोठ्या शिताफीने या ‘बाबा’ला अटक करण्यात आली असून, आता त्याच्या काळ्या धंद्यांचे पाढे वाचले जात आहेत.
बोंबील विक्रेता ते भोंदू बाबा: धक्कादायक प्रवास
मनोहर भोसले याचा ‘सफर’ थक्क करणारा आहे. मूळचा इंदापूरच्या लासुर्णे गावचा असलेला मनोहर डी.एड.च्या परीक्षेत नापास झाला होता. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी आठवडा बाजारात सुके बोंबील विकणारा हा तरुण अचानक गायब झाला. काही वर्षांनंतर तो प्रकटला आणि आपल्याला ‘संत बाळूमामा’ प्रसन्न असल्याचा बनाव रचला. करमाळ्यातील घोटी येथे २७ एकरांत त्याने आलिशान आश्रम थाटला, जिथे अमावस्येला श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार मांडला जात असे.
न्यायालयातील ‘हायव्होल्टेज’ युक्तिवाद
बचाव पक्ष: मनोहरच्या वकिलांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला. कलमे सौम्य असल्याने नोटीस देऊन अटक करायला हवी होती, असा युक्तिवाद त्यांनी मांडला. जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांनी मनोहरचा गुन्हेगारी इतिहास न्यायालयासमोर ठेवला. “हा सराईत गुन्हेगार असून याच्याविरोधात फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे सखोल तपासासाठी कोठडी गरजेची आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
११ हजारांची ‘फी’ आणि राजकीय कनेक्शन
तपासात असे समोर आले आहे की, या बाबाला भेटण्यासाठी भक्तांना ११ हजार रुपयांची फी मोजावी लागत असे. मणक्याचे आजार बरे करणे, कॅन्सरवर उपाय करणे आणि व्यवसायात प्रगती करून देणे, अशा भूलथापा मारून त्याने अनेकांना लुटले आहे. विशेष म्हणजे, अनेक बड्या नेत्यांसोबतचे त्याचे फोटो पाहून सर्वसामान्य जनता त्याच्या जाळ्यात सहज ओढली जात असे. २०२१ मध्ये एकापाठोपाठ तीन गुन्हे दाखल होऊनही मनोहरची भोंदूगिरी थांबली नव्हती. आता पोलीस कोठडीत त्याच्या या २७ एकर आश्रमातील काळी कृत्ये आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार असल्याने अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणले आहेत.


