Devendra Fadnavis: गेल्या २४ तासांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेली देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची ‘मध्यरात्रीची भेट’ ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. “आम्हाला भेटायचे असेल तर आम्ही लपून कशाला भेटू?” असा रोखठोक सवाल करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसेच, खोटी माहिती पसरवणाऱ्यांविरुद्ध आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
काय होता तो सोशल मीडियावरील दावा?
प्रकाश आंबेडकर यांच्याशी संबंधित ‘प्रबुद्ध भारत’ या माध्यमाच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे या वादाला तोंड फुटले होते. २३ एप्रिल रोजी पहाटे २ च्या सुमारास उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पोहोचले आणि उभय नेत्यांमध्ये विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर खलबतं झाली, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता. या दाव्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
“खुलेआम भेटू, चोरून कशाला?” – फडणवीसांचा पलटवार
या अफवांवर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आणि अफवा पसरवणाऱ्यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि माझ्यात कोणतीही गुप्त भेट झालेली नाही. आमचे कोणतेही विषय लपवण्यासारखे नाहीत.” जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पसरवून संभ्रम निर्माण करणाऱ्या सोशल मीडिया हँडल्सना कायदेशीर नोटीस पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
दोन्ही बाजूंकडून नकार
केवळ भाजपच नाही, तर ठाकरेंच्या शिवसेनेनेही अशा कोणत्याही भेटीचा इन्कार केला आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी हे वृत्त पूर्णपणे कपोलकल्पित असल्याचे सांगत जनतेला अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.


