Pune Crime: एखाद्या क्राईम थ्रिलर चित्रपटालाही मागे टाकेल अशी एक अंगावर शहारे आणणारी घटना पुण्यात उघडकीस आली आहे. अवघ्या १७ वर्षांच्या अमनसिंग गच्चड या मुलाची अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि क्रूरतेचा कळस गाठत हत्या करण्यात आली. जुन्या भांडणाचा बदला घेण्यासाठी आरोपींनी चक्क ‘हनीट्रॅप’चा वापर करून अमनसिंगचा काटा काढला.
इन्स्टाग्रामवरून रचला सापळा
या हत्येमागील मुख्य कारण सप्टेंबर २०२५ मध्ये झालेला वाद होता. मुख्य आरोपी प्रथमेश आढळ याला अमनसिंगने एका भांडणात जखमी केले होते. याचाच बदला घेण्यासाठी प्रथमेशने डाव आखला. अमनसिंग इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असायचा, हीच गोष्ट आरोपींनी हेरली. एका तरुणीच्या माध्यमातून त्याच्याशी मैत्री वाढवून त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आले. २९ डिसेंबर रोजी याच तरुणीने त्याला भेटीसाठी बोलावले, मात्र तेथे त्याच्यासाठी मृत्यू दबा धरून बसला होता.
क्रूरतेची परिसीमा, स्वतःचा खड्डा स्वतःच खोदायला लावला
खेड शिवापूर परिसरातील निर्जन डोंगररांगांमध्ये नेल्यानंतर आरोपींनी अमनसिंगचा जो छळ केला, त्याने पोलीसही सुन्न झाले आहेत. हत्येपूर्वीचा आरोपींनी त्याला मारण्यापूर्वी त्याची शेवटची इच्छा विचारली आणि त्याला बिअर व सिगारेट दिली. गुन्हेगारांनी अमनसिंगला स्वतःसाठी स्वतःच खड्डा खोदायला भाग पाडले. त्याला जिवंत गाडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर, आरोपींनी सर्जिकल ब्लेडने त्याच्यावर वार केले. शेवटी कोयत्याने गळा चिरून आणि दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. हा अमानुष छळ सुमारे चार तास सुरू होता.
पोलिसांची कारवाई आणि तपास
अमनसिंग बेपत्ता झाल्याची तक्रार विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी प्रथमेश आढळ आणि नागेश धबाले यांना बेळगावमधून अटक करण्यात आली. त्यांच्या कबुलीवरून ७ जानेवारी रोजी अमनसिंगचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह डोंगराळ भागातून ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत ५ जणांना अटक झाली असून एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल आहे. अटक केलेल्यांना न्यायालयाने ९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटात सहभागी असलेल्या तरुणीचा शोध पोलीस सध्या घेत आहेत.


