Lalremruata Khiangte Death: भारतीय क्रिकेट क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. मिझोरामचा अनुभवी आणि आशादायक क्रिकेटपटू लालरेमरुता खियांगटे यांचे एका सामन्यादरम्यान मैदानातच प्रकृती बिघडल्याने वयाच्या ३७ व्या वर्षी निधन झाले. या घटनेमुळे मिझोरामसह संपूर्ण देशातील क्रिकेट प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
मैदानावर नेमकं काय घडलं?
मिझोराममधील सिहमुई येथे गुरुवारी स्थानिक क्रिकेट स्पर्धेचा सामना सुरू होता. लालरेमरुता खियांगटे हे त्यांच्या ‘वेंघनुई रेडर्स क्रिकेट क्लब’ कडून चावनपुई इल्मोव्ह क्रिकेट क्लब विरुद्ध मैदानात उतरले होते. सामन्यादरम्यान अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ते खेळपट्टीवरच बेशुद्ध पडले. मैदानावर उपस्थित असलेल्या सहकाऱ्यांनी आणि वैद्यकीय पथकाने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न अयशस्वी ठरले. डॉक्टरांच्या मते, त्यांना आलेला स्ट्रोक (Heart Stroke) प्राणघातक ठरला आणि उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिझोराम क्रिकेटमधील एक दिग्गज नाव
लालरेमरुता खियांगटे हे मिझोराम क्रिकेटमधील एक महत्त्वाचे खेळाडू होते. त्यांची कारकीर्द प्रभावशाली राहिली आहे. २०१८ ते २०२२ या काळात त्यांनी राज्याच्या वरिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व केले आणि २ प्रथम श्रेणी सामने खेळले. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यांनी ७ सामन्यांत मिझोरामचे प्रतिनिधित्व केले होते. स्थानिक पातळीवर त्यांनी अनेक नामांकित क्लबकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती.
क्रीडा जगतातून श्रद्धांजली
या दुःखद घटनेवर मिझोरामचे क्रीडा आणि युवा सेवा मंत्री लालनगिंगलोवा हमार यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “लालरेमरुता यांचे निधन हे क्रीडा जगताचे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे.” तसेच, क्रिकेट असोसिएशन ऑफ मिझोराम (CAM) ने देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “खियांगटे हे एक समर्पित खेळाडू होते. त्यांनी रणजी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये राज्याचे नाव उज्ज्वल केले,” असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे. ३७ व्या वर्षी एका तंदुरुस्त खेळाडूचे अशा प्रकारे निधन झाल्याने क्रीडापटूंच्या आरोग्याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.


