Dharashiv And Eknath Shinde Shiv Sena : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे केलेल्या एका वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणातील आरोपी नगराध्यक्ष म्हणून निवडून आला, आता मातेच्या प्रसादाऐवजी भक्तांना ड्रग्जची पुडी दिली जाईल,” असे विधान सावंत यांनी केल्याचा आरोप होत असून, या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
या विधानामुळे तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील पुजारी आक्रमक झाले असून, महाराष्ट्रातील लाखो भाविकांच्या भावना दुखावल्याचा दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पुजाऱ्यांनी केली आहे.
पुजाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांना निवेदन देत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. जिल्हापरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार दिवसांपूर्वी झालेल्या एका मेळाव्यात सावंत यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगण्यात येते. पुजाऱ्यांचा आरोप आहे की, या विधानातून केवळ भाविकांच्या भावना दुखावल्या नाहीत, तर देवीच्या गाभाऱ्याच्या पवित्रतेबाबतही संशय निर्माण करण्यात आला.
दरम्यान, तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरण राज्यभर गाजले होते. या प्रकरणात विनोद गंगणे यांना अटक झाली होती, ते जामिनावर सुटले असून भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली होती. निवडणुकीत ते विजयी झाल्यानंतर, तानाजी सावंत यांनी भाजप आणि आमदार राणाजगजित सिंह यांच्यावर टीका करत हे वक्तव्य केल्याचे सांगितले जाते.
या प्रकरणी पुजाऱ्यांनी तानाजी सावंत यांनी जाहीर माफी मागावी, अशीही मागणी केली असून, आता प्रशासन या तक्रारीवर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


