नागपूर : महानगरपालिका निवडणुकीदरम्यान पक्षशिस्तीचा भंग केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीने मोठी कारवाई करत तब्बल ३२ पदाधिकारी व नेत्यांना पक्षातून निलंबित केले आहे. या कारवाईत पाच वेळा नगरसेवक राहिलेले ज्येष्ठ नेते सुनील अग्रवाल, माजी नगरसेवक भगवान मेंढे, माजी नगरसेवक दीपक चौधरी, माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर तसेच माजी नगरसेविका नसिमाबानो यांचा समावेश आहे. संबंधित सर्व नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करणे, बंडखोरी करणे व पक्षविरोधी हालचाली केल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे. भाजपने ‘शिस्त’ आणि ‘पक्षनिष्ठा’ या तत्त्वांना सर्वोच्च प्राधान्य दिले असून, पक्षाचा आदेश अंतिम असल्याचे स्पष्ट संकेत या निर्णयातून देण्यात आले आहेत.
निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांमध्ये विविध प्रभागांतील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. प्रभागनिहाय यादीत प्रभाग १ ते ३४ मधील एकूण ३२ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
या संदर्भात भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी स्पष्ट भूमिका मांडताना सांगितले की, “भारतीय जनता पार्टी हा शिस्तबद्ध कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाचा आदेश अंतिम असतो. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत गय केली जाणार नाही.”
या कारवाईमुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून पक्षशिस्तीचा कठोर संदेश दिला गेल्याचे मानले जात आहे.


