Pune Crime: येरवडा मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. एका जुन्या हत्येचे प्रकरण ताजे असताना आता एका ६५ वर्षीय ज्येष्ठ कैद्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार, कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या देवकरप्पा गराळे (६५) या वृद्ध कैद्याला अन्य एका कैद्याने लक्ष्य केले. फजल अहमद अब्दुलकयुम अन्सारी याने किरकोळ वादातून गराळे यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण केली. हा हल्ला इतका भीषण होता की, मारहाणीमुळे गराळे यांच्या मेंदूत रक्तस्राव (Brain Hemorrhage) झाला आहे.
तपास आणि कायदेशीर कारवाई
दरम्यान, जखमी कैद्याची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कारागृह हवालदार प्रकाश भोसले यांच्या तक्रारीवरून येरवडा पोलिसांनी आरोपी फजल अन्सारी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सी. बी. बेरड या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
प्रशासकीय ढिसाळपणावर प्रश्नचिन्ह
येरवडा कारागृहात गेल्या काही दिवसांपासून हिंसेचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच एका कैद्याची फरशीने ठेचून हत्या करण्यात आली होती. या ताज्या घटनेमुळे कारागृह प्रशासनाचा कैद्यांवरील वचक संपला आहे का? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.


