BMC Election: येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत नवा भाषिक आणि अस्मितेचा वाद पेटला आहे. भाजपचे तामिळनाडूतील नेते के. अण्णामलाई यांनी मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ करत, हे शहर केवळ महाराष्ट्राचे नसून आंतरराष्ट्रीय शहर आहे,” असे विधान केल्याने राजकारण तापले आहे. अण्णामलाई यांनी मुंबईच्या ७५ हजार कोटींच्या बजेटचा दाखला देत, शहराच्या विकासासाठी केंद्र, राज्य आणि महापालिकेत एकाच विचारधारेचे ‘ट्रिपल इंजिन’ सरकार असणे गरजेचे असल्याचे म्हटले. मात्र, त्यांच्या या विधानामुळे मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाहण्याच्या भाजपच्या मानसिकतेवर विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी भाजपच्या पोटातले ओठावर आले, अशा शब्दांत या भूमिकेचा समाचार घेतला आहे.
मनसे कार्यकर्त्यांकडून तोडफोड
दुसरीकडे, या वादाचे पडसाद रस्त्यावरही उमटताना दिसत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याणमधील प्रचार संपवून परतत असताना, खारीगाव पुलावरील ‘बॉम्बे ढाबा’ या नावाच्या बोर्डामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर तातडीने मनसे कार्यकर्त्यांनी तो फलक तोडून आपली आक्रमक भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा – Sanjay Raut : “लाडक्या बहिणींना 1500 देऊन अब्रू विकत घेताय का?” संजय राऊतांचा भाजपवर संतप्त हल्लाबोल
राजकीय संघर्षाची ठिणगी
आगामी निवडणुकीत उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने परराज्यातील नेत्यांची फळी मैदानात उतरवली आहे. मात्र, अण्णामलाई यांच्या विधानामुळे मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला असून, भाजपची ही रणनीती त्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकरणावरून आता मुंबईत मोठ्या राजकीय संघर्षाची ठिणगी पडली आहे.


