Sanjay Raut : बदलापूरमधील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. या प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे यालाच भाजपने कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून राजकीय वर्तुळातही जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. “लैंगिक अत्याचारातील आरोपींशी भाजपला युती चालते का? एकीकडे ‘लाडक्या बहिणींना’ 1500 रुपये देतो म्हणता आणि दुसरीकडे अशा आरोपींना सत्तेत स्थान देता. पैसे देऊन महिलांची अब्रू विकत घेताय का?” असा थेट सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
राऊत म्हणाले की, बदलापूर प्रकरणानंतर संपूर्ण शहर पेटले होते, आंदोलन झाले, मुख्यमंत्र्यांनाही हस्तक्षेप करावा लागला. मात्र, ज्या शाळेत हा प्रकार घडला, त्या शाळेच्या संचालकांवर जबाबदारी निश्चित करण्याऐवजी त्यांना राजकीय संरक्षण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “जे जेलमध्ये असायला हवे होते, ते आज नगरपालिकेच्या सभागृहात बसले आहेत,” असा टोला लगावत राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली.


