मुंबई | दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांची अभ्यासाची लगबग वाढली आहे. अशातच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेसाठी हॉल तिकीट देण्याबाबत मोठी अपडेट जाहीर करण्यात आली आहे.
राज्य मंडळाच्या माहितीनुसार, बारावीच्या परीक्षेसाठीचे हॉल तिकीट १२ जानेवारीपासून उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील. [www.mahahsscboard.in](http://www.mahahsscboard.in) या वेबसाइटवरून शाळा व महाविद्यालयांनी हॉल तिकीट डाउनलोड करायचे आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली.
बारावीच्या परीक्षेसाठी बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे हॉल तिकीट ऑनलाइन उपलब्ध करून दिले जाणार असून, शाळा व महाविद्यालयांनी त्याची प्रत काढून विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. हॉल तिकीटावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची सही व शिक्का असणे आवश्यक आहे. फोटो असलेल्या हॉल तिकीटावर शिक्का व स्वाक्षरी नसल्यास ते ग्राह्य धरले जाणार नाही.
दरम्यान, बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांकडे हॉल तिकीट असणे अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेशपत्र मिळवण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.


