मुंबई : मुंबईत एक हृदयद्रावक दुर्घटना घडली असून, घरातील फ्रिजचा अचानक स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोरेगाव परिसरात ही घटना रात्री सुमारे 3 वाजताच्या सुमारास घडली. पावस्कर कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक घरातील फ्रिजचा जोरदार स्फोट झाला. काही क्षणांतच संपूर्ण घराला आगीने वेढले.
घराला बाहेरून प्लास्टिक शीट लावलेली असल्याने आगीने अधिक भडका उडाला आणि धुराचे लोट पसरले. या भीषण आगीत संजोग पावस्कर आणि त्यांची दोन मुले हर्षदा पावस्कर (19) व कुशल पावस्कर (12) यांचा होरपळून मृत्यू झाला.
आग लागल्यानंतर लहान मुलांनी जीव वाचवण्यासाठी धडपड केली. 12 वर्षीय कुशल आग टाळण्यासाठी बाथरूममध्ये लपला होता. मात्र वाढत्या धुरामुळे आणि आगीच्या तीव्रतेमुळे त्याचा गुदमरून मृत्यू झाला.
या दुर्घटनेत एकच दिलासा म्हणजे, मुलांची आई रात्रपाळीच्या कामावर असल्याने त्या वेळी घरी नव्हती. त्यामुळे त्या बचावल्या. मात्र एका रात्रीत संपूर्ण कुटुंब गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता.
गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी एडीआर दाखल केला असून, फ्रिजचा स्फोट नेमका कशामुळे झाला आणि आगीचे कारण काय, याचा सखोल तपास पोलीस व अग्निशमन दल करत आहे.


