Uddhav Thackeray: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका विशेष मुलाखतीद्वारे भाजपच्या धोरणांवर आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली आहे. भाजपची कार्यपद्धती ही ‘चाणक्य नीती’ नसून ती केवळ ‘कपटनीती’ आहे, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, भाजपने केवळ सत्तेसाठी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ‘मिंधेसेना’ तयार करून मराठी मतांचे विभाजन करण्याचा डाव आखला आहे. ‘माझे नाव, माझे वडील आणि धनुष्यबाण ही निशाणी चोरली असली, तरी शिवसेना कागदावर संपवता येणार नाही,’ असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीवरून बोलताना ठाकरेंनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. महापालिकेच्या ९२ हजार कोटींच्या मुदत ठेवींपैकी ७० हजार कोटींच्या ठेवी तोडल्या गेल्या असून, यातील २२ हजार कोटी रुपये भाजपने आपल्या मर्जीतील कंत्राटदारांच्या घशात घातल्याचा दावा त्यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी सुरत लुटली होती, मात्र हे लोक इंग्रजांपेक्षाही वाईट पद्धतीने मुंबईची लूट करत आहेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरही टीका
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरही शाब्दिक प्रहार केला. निवडणूक प्रक्रियेतील दबावावरून भाष्य करताना, आमच्या टीकेमुळे फडणवीसांना मिरचीची धुरी लागली आहे, पण आता तर आम्ही नुसती सुरुवात केली आहे, असा इशारा दिला. तसेच, अजित पवारांवरील ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे काय झाले? असा सवाल करत, सत्तेसाठी भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेणाऱ्या भाजपने माफी मागावी, अशी मागणी केली. बदलापूर प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी भाजपवर ‘विकृतीला स्वीकृती’ देण्याचा आरोप केला आणि मुख्य आरोपीच्या एन्काउंटरवरून सरकारला धारेवर धरले.


