Washim Crime: वाशिम रेल्वे स्थानक परिसरात एका ४५ ते ५० वयोगटातील महिलेवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाशिम पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
काल दुपारी वाशिम रेल्वे स्थानकाच्या निर्जन परिसरात एका अज्ञात महिलेचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. आरोपीने महिलेचे डोके दगडाने छिन्नविच्छिन्न केले होते. घटनास्थळी पोलिसांना दारूच्या बाटल्या, पँटचा बेल्ट आणि खाण्याचे साहित्य विखुरलेले सापडले. यावरून महिलेवर प्रथम सामूहिक किंवा वैयक्तिक अत्याचार झाला असावा आणि ओळख पटू नये म्हणून तिची क्रूर हत्या केली असावी, असा संशय बळावला होता.
हेही वाचा – Beed Crime News: बीडमध्ये अनैतिक संबंधातून हत्येचा थरार; भररस्त्यात गोळीबार करत तरुणाला संपवलं
तपास आणि आरोपीला अटक
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (SIT) तैनात करण्यात आले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेतला. तांत्रिक तपासाअंती पोलिसांनी संतोष रामराव खंडारे (रा. अडुळा बाजार, जि. अमरावती) याला अकोला रेल्वे स्थानक परिसरातून शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीची कबुली आणि पुढील कारवाई
पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी संतोष खंडारे याने महिलेवर बलात्कार केल्याची आणि त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याची कबुली दिली आहे. सध्या मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर बलात्काराच्या पुष्टीबाबत अधिकृत माहिती समोर येईल. पोलिसांनी आरोपीवर कठोर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.


