मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. ऐन मतदानाच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला असून उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवडीचे माजी आमदार दगडू सपकाळ यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला.
लालबाग-परळ परिसरात प्रभाव असलेले दगडू सपकाळ हे पश्चिम महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख म्हणूनही जबाबदारी सांभाळत होते. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक २०३ मधून त्यांची मुलगी निवडणूक लढवण्यास इच्छुक होती. मात्र ठाकरे गटाकडून तिला उमेदवारी नाकारण्यात आल्याने सपकाळ नाराज असल्याची चर्चा होती.
दोन दिवसांपूर्वी दगडू सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्याआधी “आता आपण म्हातारे झालो, पक्षाला आपली गरज उरलेली नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती. तेव्हापासूनच ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर आज त्यांनी निर्णय घेत शिंदेसेनेत प्रवेश केला.
या प्रवेशानंतर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आज शिवसेनेसाठी आनंदाचा दिवस आहे. दगडू सपकाळांचे नेतृत्व दगडासारखे कणखर आहे. ज्यांनी शिवसेनेसाठी साडेतीन वर्षे तुरुंगवास भोगला, अशा कार्यकर्त्याची अवहेलना होणं दुर्दैवी आहे. बाळासाहेबांनी घडवलेली माणसं आज खरी शिवसेना पुढे नेत आहेत. २०१९ आणि २०२२ मध्ये काय घडलं, हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. २०२२ च्या निर्णयाला जनतेने स्वीकार दिला,” असे शिंदे म्हणाले.
जुन्या शिवसैनिकाने आणि अनुभवी नेत्याने ठाकरे गटाची साथ सोडल्याने हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.


