सातारा : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानाचा पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर असताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. लेकीचा जन्म होण्याआधीच काही तासांत वीर जवानाने प्राण गमावल्याने साताऱ्यातील दरे गावावर शोककळा पसरली आहे. प्रमोद परशुराम जाधव असे अपघातात निधन झालेल्या जवानाचे नाव आहे.
सिकंदराबाद-श्रीनगर येथे भारतीय सैन्यात सेवा बजावणारे प्रमोद जाधव हे आई नसल्यामुळे पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आठ दिवसांपूर्वी गावी आले होते. मात्र, नियतीला काही वेगळंच मान्य होतं. काही कामानिमित्त दुचाकीवरून वाढे फाट्याकडे जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच दरे गावासह संपूर्ण परळी खोऱ्यात शोककळा पसरली. आज सकाळी वीर जवानाचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. याच दरम्यान त्यांच्या पत्नीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. वडिलांचे तोंड पाहण्याआधीच पोरकी झालेली ही नवजात बालिका आणि शोकाकुल पत्नीचा अंत्यविधीतील क्षण उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा ठरला.
अंत्ययात्रा अंत्यविधीस्थळी पोहोचल्यानंतर पत्नी आणि नवजात बाळाला अंतिम दर्शनासाठी आणण्यात आले. काही तासांपूर्वी जन्मलेल्या लेकीने घेतलेले वडिलांचे अंतिम दर्शन पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. दुपारच्या सुमारास शासकीय इतमामात प्रमोद जाधव यांना मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. वीर जवान प्रमोद जाधव यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि नवजात मुलगी असा परिवार आहे.


