Gaja Marne News: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणमैदानात आता ‘क्राईम आणि पॉलिटिक्स’च्या चर्चेने जोर धरला आहे. तडीपारी आणि गुन्हेगारी प्रकरणांमुळे शहराबाहेर असलेल्या कुख्यात गजानन ऊर्फ गजा मारणे याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मतदानाची धामधूम आणि निकालाचा थरार अशा दोन महत्त्वाच्या दिवशी म्हणजे १५ आणि १६ जानेवारी रोजी मारणेला पुणे शहरात राहण्याची मुभा मिळाली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कोथरूडसह पुण्याच्या पश्चिम भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोर्टाने का दिली सवलत?
हा संपूर्ण संघर्ष गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे यांच्या निवडणूक रिंगणातील सहभागाशी जोडला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवार असलेल्या जयश्री मारणे यांच्या प्रचारात आणि मतदान प्रक्रियेत वैयक्तिक मदत करता यावी, या हेतूने गजा मारणेने न्यायालयाचे दार ठोठावले होते. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला बंदीचा आदेश उच्च न्यायालयाने अंशतः बाजूला सारून केवळ ४८ तासांची सवलत दिली आहे.
उच्च न्यायालयाने गजा मारणेला शहरात येण्याची परवानगी देतानाच त्याच्या भोवती अटींचे कडक कुंपण घातले आहे. मारणेने कोणत्याही मतदारावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दबाव टाकता कामा नये. जर मारणेने निवडणूक नियमांचे उल्लंघन केले, तर त्याला तात्काळ अटकेला सामोरे जावे लागू शकते. मारणे पुण्यात पाऊल ठेवल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत प्रत्येक मिनिटाचा हिशोब पोलीस प्रशासनाकडे असणार आहे.
हेही वाचा – Pune PMC Election : पुण्यातील ‘या’ भागांतील निकाल लागणार सर्वात आधी; प्रशासनाची तयारी पूर्ण
कोथरूडमध्ये ‘हाय अलर्ट’
‘मकोका’सारख्या कठोर कायद्याखाली कारवाई झालेल्या गजा मारणेचा कोथरूड आणि आसपासच्या परिसरात मोठा प्रभाव मानला जातो. मतदानाच्या दिवशी मारणेची उपस्थिती विरोधकांसाठी चिंतेचा विषय ठरू शकते, असा राजकीय अंदाज वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून संवेदनशील केंद्रांवर जास्तीचा फौजफाटा तैनात केला आहे.


