PMC Election Results: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी आज संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेषतः पुण्यातील ऐतिहासिक पेठ भागातील प्रभाग क्रमांक २३ (नाना पेठ-गणेश पेठ) मधील निकालाने मोठी खळबळ उडवून दिली आहे. हत्येच्या आणि खंडणीच्या आरोपाखाली सध्या कारागृहात असलेल्या सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तिकिटावर निवडून आल्या आहेत. या चुरशीच्या लढतीत त्यांनी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या उमेदवार आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना पराभूत केले आहे.
जेलमधून विजय खेचून आणला
पुणे शहराला हादरवून सोडणाऱ्या आयुष कोमकर हत्या प्रकरणात आणि कोट्यवधींच्या खंडणीच्या गुन्ह्यात सध्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर या तुरुंगात आहेत. न्यायालयातून विशेष परवानगी घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. प्रभाग २३ मध्ये एकूण ४ जागांसाठी निवडणूक झाली. यातील २ जागांवर आंदेकर भगिनींनी विजय मिळवला, तर उर्वरित २ जागा भारतीय जनता पक्षाने (BJP) जिंकल्या आहेत. दरम्यान, कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, स्थानिक पातळीवर आंदेकर टोळीचा असलेला प्रभाव आणि मतदारांनी दिलेला कौल धंगेकरांच्या प्रतिष्ठेला मोठा तडा देऊन गेला आहे.
निवडणुकीपूर्वी ‘मोक्का’ लागलेल्या आणि गंभीर आरोप असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चौफेर टीका झाली होती. भाजपसह अनेक सामाजिक संघटनांनी “पुणे गुन्हेगारीमुक्त करण्याचे” आश्वासन देणाऱ्या दादांना धारेवर धरले होते. मात्र, आता मतदारांनी हत्येचा आरोप असलेल्या उमेदवारांना निवडून दिल्याने, राजकारण आणि गुन्हेगारी यांच्यातील अतूट नात्यावर पुन्हा एकदा तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
आंदेकर टोळीचा महापालिकेत ‘दबदबा’
माजी नगरसेवक दिवंगत वनराज आंदेकर यांच्या पत्नी सोनाली आणि नातेवाईक लक्ष्मी आंदेकर आता पुणे महापालिकेच्या सभागृहात लोकप्रतिनिधी म्हणून बसणार आहेत. या विजयामुळे पुण्यातील नाना पेठ आणि गणेश पेठ परिसरात आंदेकर टोळीचे राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


