PMC Election Result: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालांनी आज मोठी राजकीय उलथापालथ घडवून आणली आहे. फायरब्रँड नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वसंत मोरे (तात्या) यांच्यासह त्यांचे चिरंजीव रुपेश मोरे या दोघांनाही मतदारांनी नाकारले आहे. कात्रज-कोंढवा पट्ट्यात मोठे वर्चस्व असलेल्या मोरे कुटुंबाचा हा पराभव राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
बालेकिल्ल्यातच ‘मोरें’चा पॅनल भुईसपाट
वसंत मोरे यांनी प्रभाग क्रमांक 38 (बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव) मधून निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या पॅनलचे मोठे आव्हान होते. योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोरे यांच्या पॅनलवर एकतर्फी विजय मिळवला. कात्रज-कोंढवा रोडच्या कामावरून आणि स्थानिक नागरी प्रश्नांवरून आमदार टिळेकर आणि वसंत मोरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहेत, मात्र या लढाईत टिळेकर यांनी बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
चिरंजीव रुपेश मोरेंनाही मतदारांनी नाकारलं
वसंत मोरे यांनी आपला मुलगा रुपेश मोरे यांना प्रभाग क्रमांक 40 (कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी) मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात प्रवेश करणाऱ्या रुपेश यांनाही या निवडणुकीत यश मिळाले नाही. दोघांच्याही पराभवामुळे मोरे समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
बेधडक स्टाईल
वसंत मोरे हे आपल्या ‘बेधडक’ कार्यपद्धतीमुळे पुण्यात लोकप्रिय आहेत. यापूर्वी त्यांनी मनसेकडून नगरसेवक म्हणून काम केले होते आणि अलीकडेच लोकसभा निवडणूकही लढवली होती. महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी चुरशीची मोर्चेबांधणी केली होती, मात्र मतदारांनी त्यांना ‘ठाकरे गट’ प्रवेशानंतरच्या पहिल्या निवडणुकीत नाकारल्याचे दिसून येत आहे.


