सांगोला: महूद (ता. सांगोला) गावात ३२ वर्षीय जीबीएसचा पहिला रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य विभागामार्फत तातडीने गावात होम टू होम भेटी देऊन सर्वेक्षण सुरू केले आहे. दरम्यान सदर रुग्णावर पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
महाराष्ट्रात पुणे, मुंबई, सोलापूर या ठिकाणी जीबीएसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार दूषित पाणी, अन्नपदार्थ खाण्यामुळे बळावतोय. त्यामुळे आरोग्य विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्यासाठी आवाहन केले आहे. साधारण कमरेखालील भागास अशक्तपणा येणे, पायांना मुंग्या येणे, जुलाब होणे, सांधे दुखणे अशी लक्षणे जीबीएस आजाराची आहेत. महूद गावात आरोग्य विभागामार्फत संबंधित जीबीएस रुग्णाची दखल घेऊन घरातील पाण्याचे नमुने तपासणी तसेच गृहभेटी देऊन कोणास अशी लक्षणे आहेत का? याविषयी माहिती येऊन आजाराविषयी जनजागृती सुरू केली आहे.


