पुणे : रविवारी मुळशी धरण परिसरात फिरायला गेलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरातील दोन महाविद्यालयीन युवक बुडाल्याची घटना घडली. बुडालेल्या युवकांचा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शोध घेण्यात येत आहे. अनिश राऊत (वय १८, रा. पिंपरी), विशाल राठोड (वय १७, रा. चिंचवड) अशी मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत.
पौड पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिश आणि विशाल हे एका महाविद्यलयात शिक्षण घेत आहेत. दोघेही त्यांचे मित्र गोविंद चाकली, जीत लोंढे, अथर्व राऊत, राज यादव, सोहम जाधव, आदित्य बाबर हे रविवारी सकाळी मुळशी धरण परिसरात फिरायला गेले होते. त्यावेळी चाचिवली-ढोकळवाडी परिसरात धरणाच्या पाणलोटात ते पोहण्यासाठी उतरले. त्यानंतर त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अनिश आणि विशाल बुडाले. या घटनेची माहिती सोबत असलेल्या मित्रांनी ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पौड पोलिसानी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान पौड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, उपनिरीक्षक योगेश जाधव, हिंजवडीतील पाणबुड्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि ग्रामस्थांनी तातडीने बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली.


