मुंबई : पहिल्यांदाच बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकत मुंबईवर वर्चस्व मिळवणाऱ्या भाजपसमोर आता महापौरपदावरून नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. महापौरपदावर कोणाची वर्णी लागणार, यावरून भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीतून महत्त्वाचा आणि ठाम संदेश मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.
भाजपने यंदाच्या निवडणुकीत ८९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. मात्र, २२७ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी आवश्यक असलेला ११४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या २९ नगरसेवकांची गरज भासणार आहे. हीच अडचण ओळखून शिंदे गटाने पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपद आणि स्थायी समितीसह महत्त्वाच्या समित्यांमध्ये वाटा देण्याची मागणी केली होती.
दिल्लीचा स्पष्ट संदेश, महापौर भाजपचाच
या पार्श्वभूमीवर भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट शब्दांत सांगितल्याची चर्चा आहे की, “मुंबईच्या महापौरपदाबाबत कोणतीही तडजोड करायची नाही.” मुंबई महानगरपालिकेत भाजप सर्वाधिक जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे महापौरपदावर भाजपचाच नैसर्गिक हक्क आहे, ही भूमिका मित्रपक्षांसमोर ठामपणे मांडा, असा आदेश फडणवीसांना देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, हे करताना मित्रपक्षांशी कटुता निर्माण होणार नाही, याचीही काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कार्यकर्त्यांची भावना महत्त्वाची
भाजप नेतृत्वाच्या मते, मुंबईत महापौरपद भाजपकडे यावे, ही हजारो कार्यकर्त्यांची भावना आहे आणि त्या भावनेचा सन्मान होणे गरजेचे आहे. ही बाब शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला समजावून सांगा, तसेच इतर पदे व इतर महानगरपालिकांमध्ये सन्मानजनक तोडगा काढण्याबाबत चर्चा करा, असेही फडणवीसांना सांगण्यात आले आहे.
मुंबईत कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली?
भाजप- 21.2 टक्के
ठाकरे गट- 13.13 टक्के
शिवसेना- 5 टक्के
काँग्रेस- 4.44 टक्के
एमआयएम-1.25 टक्के
मनसे- 1.37 टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस- 0.45 टक्के
सपा- 0.28 टक्के
शरद पवार गट- 0.22 टक्के


