पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये चक्क पेट्रोल सोबत पाणी मिसळल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील शाहुनगरमधील भोसले पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरल्यानंतर काही वेळातच अनेक वाहने बिघडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. याबाबत सोशल मिडीयावर एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांकडून होणाऱ्या फसवणूकीबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहेत.
शाहुनगरमधील भोसले पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहन चालकांनी इंजिनमध्ये बिघाड झाल्यावर लगेच तक्रार केली. केवळ एक ते दोन लिटर पेट्रोल वाहनांमध्ये भरल्यानंतर इंजिनमध्ये अचानक बिघाड झाला. याप्रकरणाची तपासणी केल्यानंतर पाणी आढळून आले, ज्यावर थोडेसे पेट्रोल तरंगत होते. या अहवालात पाण्याचे प्रमाण ८०%, तर २०% पेट्रोल दिसून आले. पेट्रोल पंपाच्या जमिनीखाली असणाऱ्या पेट्रोल टाक्यांमध्ये पाणी शिरल्याने ही समस्या निर्माण झाली असावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र खरंच असे झाले आहे का? की जाणूनबुजून पेट्रोलमध्ये पाणी मिसळण्यात आले, याबाबत तपास सुरु आहे.
View this post on Instagram
दरम्यान या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्राहकांनी तात्काळ चौकशी करवून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पेट्रोल पंपाच्या पेट्रोल साठवण व्यवस्थेची तपासणी करावी. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.


