Navnath Ban : शिवसेना (यूबीटी) आणि सत्ताधारी महायुती यांच्यातील शाब्दिक युद्ध आता अत्यंत खालच्या स्तरावर पोहोचले आहे. खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून केलेल्या टीकेला भाजपने ‘जशास तसे’ उत्तर दिले आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांचा उल्लेख ‘राहुल गांधींची नवरी’ असा करत जहरी टीका केली आहे. संजय राऊत यांनी अलीकडेच मुख्यमंत्र्यांची तुलना ‘दिल्लीच्या सासरवाडीत गेलेल्या रुसलेल्या सुनेशी’ केली होती.
याला उत्तर देताना नवनाथ बन म्हणाले, “दुसऱ्यांच्या घरच्या सुनांची चर्चा करण्यापेक्षा राऊतांनी स्वतःकडे पाहावे. ते स्वतः राहुल गांधींच्या नवरी किंवा प्रेयसीसारखे वागत आहेत.” नवनाथ बन यांनी म्हटलं आहे की, “दिल्लीत जाऊन गांधी घराण्याचे मांडलिकत्व पत्करणे आणि त्यांच्यासाठी पायघड्या घालणे, हेच राऊतांचे सध्याचे काम आहे. ज्यांनी स्वतःच गुलामी स्वीकारली आहे, त्यांनी इतरांना सल्ले देऊ नयेत.”
“उबाठा गट म्हणजे विदूषकांची फौज”
नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सद्यस्थितीची तुलना ‘कॉमेडी सर्कस’शी केली. ते म्हणाले की, या गटात आता फक्त जोकर आणि विदूषकच उरले आहेत. “संजय राऊत हे सकाळी उठले की महाराष्ट्राचे मनोरंजन करणारे ‘जोकर नंबर २’ आहेत. ज्यांच्या ५२ पत्त्यांच्या कॅटमध्ये फक्त जोकरच भरलेले आहेत, त्यांनी राजकारणावर बोलणे हास्यास्पद आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंधांवर भाष्य करताना बन यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते राज ठाकरे यांनी मदतीचा हात दिला, पण उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला. राज ठाकरेंच्या पाठिंब्यामुळे उबाठा गटाला यश मिळाले, पण त्या बदल्यात राज ठाकरेंचेच राजकीय नुकसान झाले. गळा कापणाऱ्या वृत्तीमुळेच राज ठाकरे आता उबाठा गटापासून दूर जात आहेत, असे संकेत त्यांनी दिले. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यातील घटनेचा संदर्भ देत बन म्हणाले, “राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे भाषण ऐकण्यासाठी १० मिनिटेही थांबले नाहीत. कारण, त्यांना माहिती होते की त्या भाषणात ‘वाघ-बिबट्या’च्या गोष्टींशिवाय काहीही नसते. ते रटाळ भाषण ऐकण्यापेक्षा नातीच्या वाढदिवसाला जाणे त्यांनी पसंत केले. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा संदेश आहे,” असंही बन यावेळी म्हणाले.


