Vijay Shivtare : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदावर शिवसेनाच आपली पकड ठेवणार असून, सत्तेची चावी ना अजित पवारांकडे राहील ना भाजपकडे, असा ठाम दावा शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी आमदार विजय शिवतारे यांनी केला आहे. भोर येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उमेदवारांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी विजय शिवतारे म्हणाले की, पुण्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेच्या सूचनेनुसारच निवडला जाईल. “आम्ही पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत,” असे त्यांनी सांगितले.
शिवतारे यांनी पुढे सांगितले की, शिवसेनेचे १३ विद्यमान उमेदवार असून २१ रनरअप उमेदवार आहेत. येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला २५ ते ३० जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “संपूर्ण पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व अधिक मजबूत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी चंग बांधला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
भोरमधील मोहरी येथील अमृतेश्वर मंदिरात विजय शिवतारे यांच्या हस्ते शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर झालेल्या सभेत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत, भोर तालुक्यातील सर्व शिवसेना उमेदवार विजयी होतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
विजय शिवतारेंच्या या वक्तव्यामुळे पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी यांच्यातील सत्तासंघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


