कोलकाता : पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यातील नाझिराबाद परिसरात मंगळवारी दुपारी एका गोदामाला भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाने आतापर्यंत 2 मृतदेह बाहेर काढले असून, नातेवाईकांच्या माहितीनुसार सुमारे 20 जण अद्याप बेपत्ता आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी सुमारे तीन वाजता ड्राय फूड साठवलेल्या गोदामात अचानक आग लागली. आगीची तीव्रता मोठी असल्याने अग्निशमन दलाच्या तब्बल 15 गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.
गोदामात प्रामुख्याने कोरड्या खाद्यपदार्थांची पॅकेट्स आणि सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्यांचा साठा होता. त्यामुळे आग वेगाने पसरली आणि शेजारील दुसऱ्या गोदामालाही तिचा फटका बसला. अग्निशमन दलाने काही प्रमाणात आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने इमारतीत प्रवेश केला.
मात्र, गोदाम अरुंद रस्त्यावर असल्याने अग्निशमन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी आल्या. यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास विलंब झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच पश्चिम बंगालचे ऊर्जा मंत्री अरुप विश्वास घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. ही राजकारण करण्याची वेळ नसून, पोलिस आणि अग्निशमन दलाला त्यांचे काम करू देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. रात्रीच्या ड्युटीवर असलेले कर्मचारी आणि सहा सुरक्षा रक्षक गोदामात अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार गोदाम बाहेरून बंद असल्याने आत अडकलेल्या लोकांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


