Ajit Pawar Last Rites : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावात आज शांत झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली असून, त्यांच्या पार्थिवावर उद्या (२९ जानेवारी) सकाळी ११:०० वाजता बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
आज रात्रीपर्यंत घेता येणार अंत्यदर्शन
दादांचे पार्थिव आज, २८ जानेवारी रोजी सायंकाळी ४:०० वाजेपासून बारामतीमधील विद्यानगरी चौक, विद्याप्रतिष्ठान मैदान येथे सर्वसामान्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रातून जनसागर उसळला असून, आज रात्री उशिरापर्यंत नागरिकांना अंत्यदर्शन घेता येईल.
असा असेल उद्याचा अंत्यसंस्काराचा मार्ग
- अंत्ययात्रा प्रारंभ: उद्या सकाळी ९:०० वाजता ‘गदिमा सभागृहा’पासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल.
- मार्ग: ही यात्रा गदिमा चौक आणि विद्यानगरी चौक मार्गे मार्गस्थ होऊन पुन्हा विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर येईल.
- अंतिम संस्कार: सकाळी ११:०० वाजता याच मैदानावर दादांना अखेरचा निरोप दिला जाईल.
देशभरातील दिग्गज नेते बारामतीत येणार
अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विशेष विमानाने बारामतीत दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देशातील आणि राज्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
३ दिवसांचा दुखवटा आणि शासकीय सन्मान
राज्य सरकारने २८ ते ३० जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत. आज राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली असून, बाजारपेठांनीही स्वयंस्फूर्तीने बंद पाळून आपल्या लोकनेत्याला आदरांजली वाहिली आहे.
दुर्दैवी अपघात आणि महाराष्ट्राची हानी
निवडणूक प्रचाराच्या ४ सभांचा धडाका लावण्यासाठी मुंबईहून निघालेल्या अजितदादांच्या विमानाला सकाळी ८:४० च्या सुमारास बारामती विमानतळावर भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत विमानाने पेट घेतल्यामुळे दादांसह अन्य ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. एका अत्यंत कार्यक्षम आणि धडाडीच्या नेत्याच्या अशा अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.


