कोल्हापूर: प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: इंद्रजित सावंत यांनी याबद्दलची ऑडिओ क्लिप आपल्या सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. “मुख्यमंत्री यांचे नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशूरामी ब्राम्हण धमक्या देत आहे.” असे म्हणत इंद्रजित सावंत यांनी सदर ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.
“मला अशा धमक्या नवीन नाहित पण या हरामखोरांचे शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत,यांच्या पोटात श्री शिव छत्रपतीं बद्दल काय विष भरलेले आहे. हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावे म्हणून हे रेकार्डींग व्हायरल करत आहे. या कोरटकर नावाच्या नागपूरच्या भिक्षूकालाच काय यांच्या बापाला ही हा शिवरायांचा मावळा घाबरत नाही.” असं इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.
त्यानंतर इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊनही आपली भूमिका सविस्तर मांडली आहे. मला आलेल्या धमकीचा मुद्दा नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांवर असे कुणी बोलत असेल आणि नंतर ते म्हणणार असतील की, मी असं बोललो नाही, तर महाराष्ट्राचे गृहमंत्री काय करतात? असा प्रश्नही इंद्रजित सावंत यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्याशी वाद घालताना फोनवर असलेल्या या व्यक्तीने “शिवाजी महाराज पळून गेले होते, बाजीप्रभूंमुळे ते वाचले, ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, ब्राह्मणांबद्दल एवढे वक्तव्य करू नका, तुम्ही सध्या ब्राम्हणांच्या मुख्यमंत्र्यांच्या शासनात काम करत आहात” अशी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.
मला धमकी देणाऱ्या व्यक्तीचे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत फोटो आहेत. समर्थ रामदास स्वामी नसते, तर शिवाजी महाराज नसते. अशी त्यांची ही विचारसरणी आहे, असे देखील इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.


