दिल्ली : दिल्ली विधानसभेत उपराज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान प्रचंड गोंधळ झाला. विधानसभा अध्यक्षांनी आम आदमी पक्षाच्या १२ आमदारांना निलंबित केले आहे. उपराज्यपालांच्या अभिभाषणादरम्यान आम आदमी पक्षाच्या आमदारांनी बराच गोंधळ घातला. त्यानंतर सभापतींनी १२ जणांना निलंबित केले. आज (दि. २५) मुख्यमंत्री रेखा गुप्ता सरकारी सभागृहात कॅग अहवाल सादर करणार आहेत.
निलंबन झाल्यानंतर बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या आतिशी म्हणाल्या, “भाजपने सर्व कार्यालयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो बदलून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावला आहे. भाजपला वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठे आहेत. जेव्हा आम्ही विधानसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने घोषणा दिल्या, तेव्हा ‘आप’च्या आमदारांना बाहेर काढण्यात आले. जेव्हा भाजप आमदारांनी मोदी यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या, तेव्हा त्यांना हातही लावला गेला नाही. याचा अर्थ असा की, भाजपला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आणि त्यांचे नाव आवडत नाही. देशातील जनता या अहंकाराला उत्तर देईल.”
दिल्ली विधानसभेत कॅगचा अहवाल सादर
दिल्ली विधानसभेत कॅगचा अहवाल सादर करण्यात आला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी हा अहवाल सादर केला आहे. सर्वप्रथम, दारू धोरणाशी संबंधित अहवाल सादर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाच्या नूतनीकरणात नियमांमध्ये मोठी अनियमितता झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री निवासस्थानाच्या दुरुस्तीशी संबंधित मुद्दे देखील या अहवालात समाविष्ट आहेत. २०२० मध्ये ७.६१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. परंतु, एप्रिल २०२२ पर्यंत त्यावर ३३.६६ कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे.


